मंगलदास बांदल यांना फडणवीसांची भेट भोवली, वंचितची उमेदवारी रद्द

0
255

शिवसेना शिंदे गटानंतर आता वंचित बहुजन आघाडीवर आपला जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली आहे. वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी मागे घेतली आहे. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने हा निर्णय घेतल्याचं वंचितकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. त्याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.