भोसरीत पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
686

भोसरी, दि. १९ (पीसीबी): भोसरी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

पहिली कारवाई दरोडा विरोधी पथकाने खंडोबा माळ येथील मोकळ्या मैदानात केली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, खंडोबा माळ येथे एक तरुण संशयितरीत्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार सागर शेंडगे, सुमित देवकर, गणेश सावंत यांनी खंडोबा माळ येथील मैदानात सापळा लाऊन लक्ष्मण सुरेश आखाडे (वय 19, रा. दुर्गामाता कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेत त्याच्याकडून 40 हजार रुपयांचे एक पिस्टल आणि 1500 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

दुसरी कारवाई भोसरी पोलिसांनी रामनगर बोपखेल येथे केली. भोसरी पोलीस ठाण्यातील अंमलदार धोंडीराम केंद्रे यांना, रामनगर बोपखेल येथे एका तरुणाजवळ पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी सापळा लाऊन खंडेश्वर उर्फ सोन्या शिवाजी तांबे (वय 22, रा. गणेशनगर, बोपखेल) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पोलिसांनी 35 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि 2000 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याने हे पिस्टल दिवाकर सुरेंद्र सिंग (रा. बोपखेल) याच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यामुळे दिवाकर सिंग याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.