मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मोदी सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, असे राज ठाकरे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’, असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता मोदी सरकार राज ठाकरे यांची ही मागणी मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी शुक्रवारी केंद्र सरकारने आणखी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यामध्ये कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने अटलबिहारी वाजपेयी आणि कर्पुरी ठाकूर या नेत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून भारतरत्न पुरस्काराची घोषणा अन् इंडिया आघाडीत फूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुस्कार जाहीर करताना त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. चौधरी चरणसिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. या घोषणेनंतर चौधरी चरणसिंग यांचे नातू आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दिवसांपासून चौधरी यांचा रालोद पक्ष एनडीए आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. चरणसिंग चौधरी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर जयंत चौधरी यांना तुम्ही भाजपशी युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या पुरस्काराबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. आपल्या पंतप्रधानांनी देशाची नस ओळखली आहे. युतीत आम्हाला किती जागा मिळतील याकडे मी लक्ष देणार नाही. मी कुठल्या तोंडाने एनडीएत सामील होण्याचा प्रस्ताव नाकारू?, असा प्रतिप्रश्न जयंत चौधरी यांनी केला. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या गोटात सामील होतील, अशी दाट शक्यता आहे















































