पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : बांधकाम साइटवरून साहित्य चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना बुधवारी (दि. २७) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भोसरीतील महात्मा फुले नगर येथे घडली.
संदीप रवींद्र सिंग (वय ३४, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी बुधवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुलेनगर, भोसरी येथे विघ्नहर्ता रॉयल्टी यांच्यावतीने एसआरएचे बांधकाम काम सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास तीन चोरटे (एमएच १२ एनडब्ल्यू ५८४७) या रिक्षातून बांधकाम साइटवर आले. त्यांनी ४८ हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिननियमच्या सहा प्लेटा रिक्षात भरल्या. तेथील सुरक्षा रक्षक सतर्क झाल्यावर ते रिक्षा सोडून पळून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.












































