फोफसंडी येथे नक्षत्र पाऊस काव्यसहल उत्साहात संपन्न

0
112

पाऊस धारा झेलत, हिरव्यागार टेकड्या अनुभवत, दाट धुक्यात हरवलेल्या सुंदर अशा निसर्गरम्य गावी रंगली काव्य मैफल -म.भा. चव्हाण

भोसरी, दि. ०३ (पीसीबी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय, भोसरी ,पुणे वतीने दरवर्षी अनेक ठिकाणी कवी कवित्रींना घेऊन पावसाळी सहल आयोजित केली जाते. यावर्षी महाराष्ट्राचे मॉरिशस असलेले फोफसंडी या निसर्गरम्य आदीवासी गावी नक्षत्र पाऊस काव्यसहल काढण्यात आली. येथील निसर्ग झरे, रिमझिम पाऊस, दाट धुके, हिरवे गार डोंगर अशा उंच असलेल्या डोंगराच्या माथ्यावर अनोखी अशी काव्यसहल व काव्यमैफल संपन्न झाली.

या काव्य सहलीमध्ये बोर्ड कवी म.भा. चव्हाण, प्रा. राजेंद्र सोनवणे (कवी- वादळकार), प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, कवी यशवंत घोडे, कवयित्री सौ मेहमूदा शेख, कवी बबन चव्हाण, कवी पियुष काळे, प्रा. प्रताप जगताप, सौ प्रीती सोनवणे, सौ सविता कोराड, रोहिणी ताम्हाणे, सौ. राखी काळे, संदीप नाईक, संपत नायकोडी, सचिन फुलपगार, सुधाकर गायकवाड, कवी डॉ.सुधीर जोशी, कवी ज्ञानेश्वर काजळे, दत्तात्रय मुठे, भरत वाजे, नक्षत्रा काळे,जुई यादव, बाबासाहेब लांघी, सिताराम घोडे, सखा आंबेकर, साळू घोडे, तुकाराम वडेकर, अंकुश साबळे इ.नी सहभागी होऊन आनंद लुटला.

यावेळी म.भा. चव्हाण म्हणाले,”निसर्गाच्या सानिध्यात आल्याने आपली कविता बहरते, फुलते. निसर्गाच्या सहवासात कवींची प्रतिभा बहराला येते. नवनिर्मितीची प्रेरणा अशा निसर्गाच्या सानिध्यात मिळत असते. यासाठी आपण ऑक्सिजन नव्याने मिळण्यासाठी अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. फोफसंडी इतकी सुंदर आहे की, या ठिकाणी मन रमून जातं .”

यावेळी म.भा. चव्हाण यांनी अतिशय बहारदार कवितांचे सादरीकरण केलं. तसेच उपस्थित कवींनी सुद्धा आपल्या रचनांनी आनंद दिला.

नक्षत्राचं देणं काव्यमंच वतीने यापूर्वी कोकण काव्य सहल, सागर काव्य सहल, कास पठार काव्य सहल, माळशेज घाट सहल, नाणेघाट सहल, अशा अनेक ठिकाणी कवींना घेऊन मैफिलींच आयोजन केलं आहे. निसर्ग कवींना स्वस्त बसू देत नाही. म्हणूनच अशा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन कवींची कविता फुलविण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो.
भविष्यात दर्जेदार कवी घडावे. ही भूमिका घेऊन नक्षत्राचं देणं काव्यमंच चे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांची तळमळ असते. गेले पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण उपक्रम राबवणारे हे अभिनव अशी संस्था आहे. तिच्या कार्याने कौतुकास पात्र ठरली आहे. जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही सहल फोफसंडीकडे निघाली. सुप्रसिद्ध कढी वडा व झुणका भाकर, शेंगोली, खर्डा मिरची, इंद्रायणी भात, कांदा लोणचे, भाकरी व खिरीचा आस्वाद घेत मन मुराद सहलीचा आनंद लुटला.