पिंपरी महापालिकेच्या अभियंत्याची ज्येष्ठ महिलेला फोनवरुन शिवीगाळ; विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
932

महिलेला फोन करुन अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील एका अभियंत्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २) सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथे घडला.

अभिमान भोसले असे विनयभंग करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या रावेत येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मैत्रिणीचा मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या सुनेचे आणि अभिमान भोसले याचे प्रेमसंबंध आहेत. दोघेही विवाहित असून दोघांना मोठी मुले आहेत. अभिमान हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहे.

दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीची सून आणि अभिमान यांच्याकडे लग्नाबाबत सल्ला मागण्यासाठी आले होते. यावर फिर्यादी यांनी त्या दोघांना लग्न न करण्याचा सल्ला दिला. यामुळे दोन्ही कुटुंबांचे आणि मुलांचे नुकसान होई अशी जाणीव त्यांनी करून दिली. त्यांच्या सल्ल्याला न जुमानता दोघांनी ५ मार्चला पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मैत्रिणीला मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी फिर्यादी यांनी त्यांच्या मैत्रिणीची मदत केली. यामुळे अभिमान याने चिडून फिर्यादी महिलेला फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्याने फिर्यादी यांच्या मुलीच्या मोबाईलवर फोन केला आणि अश्लील भाषेचा वापर करुन शिवीगाळ केली. यावरून अभिमान याच्याविरोधात कलम ५०९ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.