पवार विरुध्द पवार, आगीचा भडका उडणार

0
553

शरद पवार यांनी पूर्वी जे जे दुसऱ्यांच्या घरात पेरले तेच आता त्यांना त्यांच्या कुटुंबात घडताना पहावे लागते. खरे तर, कर्माचा सिध्दांत तेच सांगतो. तुम्ही सत्कर्म करा तुमच्या वाट्याला चांगलेच येणार. सत्तेच्या राजकारणासाठी पूर्वी भावा भावात लावली. काका पुतण्यांचे भांडण लावले. नणंद-भावजय, दिर-भावजय असे एकमेकांच्या विरोधात लढवले. आज ८३ वर्षांच्या शरद पवार यांना उतार वयात त्यांच्याच घरात सख्खा पुतण्या अजित पवार शड्डू ठोकतो याला काय म्हणावे. काकडे, मोहिती, कदम, भोसले, विखे, जगताप अशा एकसो एक तालेवार घराण्यांमध्ये फूट पाडण्याचे बिल शरद पवार यांच्या नावाने फाडले जाते. आज तीच वेळ शरद पवार यांच्या एकत्र कुटुंबावर आली. काळ सूड उगवतो तो असा. भाजपने गरज नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेसाठी गळाला लावले. दादा हिंमत दाखवत नव्हते म्हणून त्यांच्या मुलाबाळांसह बहिणींवर ईडी, इन्कम टॅक्सचे छापे टाकले. मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार शोधण्यासाठी सीए किरीट सोमय्यांना मागे लावले. सर्व सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्य मातीत जाणार म्हटल्यावर दादासुध्दा बधले आणि त्यांनी सरळ भाजपशी पाट लावला. थोडक्यात शरणागती पत्करली. भाजपने त्या बदल्यात दादांवरचा राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा सगळ्या फायली बंद केल्या. भाजपने आता दादांची मुलूखमैदान तोफ थेट पवार साहेबांच्या दिशेने वळवली. आज बारामतीत खुद्द अजित पवार यांचे जे भाषण झाले ती एक झलक होती. बारामती लोकसभा निवडणुकित काय रणे पेटणार त्याचा एक तुकडा होता. ज्या शरद पवार यांनी महाराष्ट्राने चार वेळा मुख्यमंत्री केले, केंद्रात वीस वर्षे मानाचे पान दिली त्याच जाणत्या राज्याला त्यांचाच पुतण्या आता सळो की पळो करून सोडणार आहे, याचे दर्शन झाले. लोकसभेला सख्खी चुलत बहिणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दादां सांगतील त्या उमेदवारालाच मते देण्याचे आवाहन तेच सांगते. पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवालासुध्दा पवार कुटुंबच कारणीभूत असल्याच्या वावड्या होत्या. आता तो हिशेबसुध्दा दादा स्वतः बारामतीत चुकता कऱणार असे दिसते. दादांची पत्नी सुनेत्रा पवार याच कदाचित बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उतरतील, असेही चित्र आहे. पार्थचा पराभव दादांनी पचवला पण पत्नीचा पराभव त्यांनी झेपणार नाही. दुसरीकडे शरद पवार यांची प्रतिष्ठा त्यांचे वय आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांची परिक्षण असेल. शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांचे कुटुंब एका बाजुला आणि दुसरीकडे अजितदादा, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांचे सोयरे धायरे असतील. पवार कुटुंबात महाभारत होणार, रणांगणात कौरव विरुध्द पांडव अशी झुंज लागणार. पुढचे वर्ष लोकसभा नंतर विधानसभा आणि पाठोपाठ महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे असणार आहे. म्हणजे वर्षभर हा संघर्ष होणार. झाकली मूठ होती ती उघडणार आहे. साहेबांसारखेच त्यांच्याच तालमीत तयार झालेले अजित दादासुध्दा खूप प्रॅक्टीकल आहेत, भावनीक नाहीत. ही लढाई कशी होणार, कोण जिंकणार ते काळच ठरवेल. मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही, असा इशारा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना देतात, तेव्हा हा संघर्ष कुठवर जाणार त्याचा अंदाज येतो. आज तूर्ताच अजितदादांच्या भाषणातून त्याचेच दर्शन झाले. जरा त्याच भाषणावर नजर टाकू…

दादा म्हणतात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना मत देऊ, तर लोकसभेला तिकडे (सुप्रिया सुळे) मत देऊ, असा विचार तुम्ही अजिबात मनात आणू नका. लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच मत द्या. यदाकदाचित लोकसभेला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीच्या बाबतही मी वेगळा निर्णय घेईन. मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही, असा इशारा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना दिला. बारामतीत व्यापारी महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी निर्वाणीची भाषा वापरली. गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेऊनही माझ्या शब्दाला तुम्ही साथ देणार नसाल तर मी हे सर्व कशासाठी करायचे. एवढाच वेळ मी माझ्या व्यवसायाला दिला तर मी हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरेन. मी जे काम करीत आहे, ते कोणीच करू शकणार नाही. कोणी कितीही दावे करू द्या, पण माझ्याएवढे काम करणार नाही, असा दावाही अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, आगामी काळात कोणी डोळ्यातून पाणी काढून जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचे की भावनिक मुद्याला पाठिंबा द्यायचा, हे बारामतीकरांना चांगलेच ठावूक आहे. विकासाला गती द्यायची की खिळ घालायाचा, याचा निर्णय बारामतीकरांनी घ्यायचा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मत द्या; विधानसभेला अजितला मत द्या, असे तुम्हाला सांगितले जाईल. पण, तुम्ही ते डोक्यातही आणू नका. ते मला अजिबात चालणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही माझ्याच विचाराला उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे. उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबतही मी वेगळा विचार करेन. त्यावेळी मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, अमित शहा यांना भेटायला मी आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेलो होतो. तेव्हा प्रफुल्ल पटेल अमित शहा यांना म्हणाले होते, छत्तीसगढ जिंकून येणे अवघड आहे. तेव्हा अमित शहा म्हणाले होते, ‘लिखकर देता हूं….तीनही राज्ये येणार…इतका आत्मविश्वास त्यांना आहे. मी सरकारमध्ये असल्यामुळे बारामतीत विकास कामे होत आहेत. ही काही जादूची कांडी नाही, आपण व्यावहारिकच बोलले पाहिजे.

बारामतीतून तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकास कामांसाठी मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगू शकतो. या लोकांनी आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला आहे, त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घ्यावा, असे आवाहनही अजितदादांनी केले