नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तीन लाख ६८ हजारांची फसवणूक

0
139

व्हेंडर रजिस्ट्रेशन व व्हिडीओ एडिटिंग प्रोजेक्ट मधून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तीन लाख ६८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

सुनील मच्छिंद्र भालेकर (वय ३१, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी महेश शिवाजी कदम (वय 31, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील भालेकर याने फिर्यादी कदम यांना व्हेंडर रजिस्ट्रेशन व व्हिडीओ एडिटिंग प्रोजेक्ट मधून फायदा मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी कदम यांच्याकडून आरोपीने तीन लाख ६८ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.