दोन लाख घेऊन उमेदवारी मागे घे – शिंदे गटाची अपक्ष उमेदवाराला खुली ऑफर

0
142

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला पार पडणार आहे. अशातच मुंबईतील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची प्रचार सभा होणार आहे. मात्र यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार हा भाजीपाला विक्रेता विक्रेता असून त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील प्रशांत घाडगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रशांत घाडगे यांना धमकवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विभागप्रमुख दीपक पवार आणि पक्ष सचिव वैभव थोरात यांनी उमेदवार प्रशांत घाडगे यांना धमकावले आहे अशी तक्रार घाडगे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

उमेदवार प्रशांत घाडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मला 6 मे ला दीपक पवार यांचा फोन आला होता. मला निवडणुकीसंदर्भात तुमच्यासोबत बोलायचे असून आपण भेटू असे ते म्हणाले होते. फोनवर झालेल्या संभाषणानुसार निवडणुकीसंदर्भात भेटण्यासाठी दोघं एकमेकांना भेटले देखील होते. त्यावेळ स्वरंक्षणासाठी तक्रारदार आणि उमेदवार प्रशांत घाडगे यांनी मोबाइलचे रेकॉर्डिंग सुरू ठेवले. यावेळी शिंदे गटाचे विभागप्रमुख दीपकने दोन लाख रुपये घे आणि निवडणूक अर्ज मागे घे असे सांगितले. तसेच दीपकने साहेबांबरोबर बोल असे सांगून पक्षाचे सचिव वैभव थोरातला फोन लावून दिला होता.