तुम्ही भ्रष्ट्राचाऱ्यांशी निकाह लावला असं बोलू का ?

0
73

मुंबई, दि. ०१ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, व्होट जिहाद काय असतो ते त्यांना एकदा विचारा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद खूप येत आहे. ते दुसरीकडे कुठे तलाक देत आहेत का? की कोणाशी निकाह करत आहेत? मतांसाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी ते निकाह करत आहेत का? हे काय सारखं जिहाद, जिहाद करत आहेत. आधी जिहादचा अर्थ समजून घ्या मग बोला, असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.

ते पुढे म्हणाले की, तुम्हाला भ्रष्ट लोकांची मत चालतात, तुम्ही भ्रष्ट्राचाऱ्यांशी निकाह लावला असं बोलू का? 70 हजार कोटींचे घोटाळे, एकनाथ शिंदे यांचे घोटाळे, चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं. मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला असं सांगू का? असा टोला देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद पाहण्यास मिळाले. धुळे लोकसभेला सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात 1 लाख 94 हजार मतांनी मागे जातो आणि त्याचा चार हजार मतांनी पराभव होतो. निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला.