तळेगाव-चाकण मार्गावर अवजड वाहतुकीला ‘या’ सहा तासांमध्ये बंदी

0
88

चिंचवड, दि. 4 ऑगस्ट (पीसीबी) – तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची प्रकरणे लक्षात घेऊन वाहतूक शाखेने हा बदल केला आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले आहेत.

चाकण-तळेगाव चौकातून तळेगाव-चाकण व चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र 548 डी हा मुंबई त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक क्षेत्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. तो चाकण-तळेगाव चौकातून जातो. तसेच पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र 60 हा देखील याच चौकातून जातो. या चौकात हलकी, जड अवजड वाहनांची तसेच पादचाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असते. या चौकात तसेच मार्गावर वारंवार चाहतूक कोंडी होत असून किरकोळ तसेच प्राणांतिक अपघात होवून जिवीतहानी होत असते.

चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवासाच्या वेळेत बदल केला आहे.

शिक्रापुर बाजूकडून चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे जाण्यास व तळेगाव बाजूकडून चाकण मार्गे शिक्रापुरकडे येण्यास हलकी / लहान वाहने वगळून सर्व जड/मध्यम वाहनांच्या वाहतुकीस सकाळी आठ ते 11 वाजे दरम्यान व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान प्रवेश बंदी असणार आहे.