राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून राज्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच दोन्ही ठाकरेंनी पुन्हा एकत्र येण्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय.
राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला. त्यामुळे आता राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण महायुतीच्या नेत्यांसाठी हा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया दिली असली तरी ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची वक्तव्य त्यांच्या पचनी पडली नसल्याची चर्चाही जोरदार रंगली आहे. तर तिन्ही नेत्यांची प्रतिक्रिया काय होती?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावात आहेत. यावेळी माध्यमांशी त्यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, एका पत्रकाराने त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. यावर ‘अरे जाऊदे यार….काय तू कामाचं बोल यार…’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.
घाई करू नका, थोडी वाट पाहा…
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले पण माध्यमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
…तर अजित पवार काय म्हणाले
ते एका कुटुंबातील आहेत, एका परिवारातील आहेत. त्यांनी त्यांच्यासंदर्भात काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात आपण नाक खुपसायचं काय कारण. प्रत्येकाला वेगवेगळा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपण त्यांनी एकत्र यावं की न यावं हे कुठल्याही राजकीय पक्षांनी सांगण्याचे कारण नाही असं म्हणत अजित पवारांनी माध्यमांनच झापलं.