ट्रेडिंग मध्ये फायदा करून देण्याच्या बहाण्याने महिलेची 26 लाखांची फसवणूक

0
85

भोसरी, दि.२९ (पीसीबी)

ट्रेडिंग मध्ये फायदा करून देण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची 26 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार IIFLPRO हे ॲप चालवणारे इसम, 8269261132 क्रमांक धारक, अंकुर केडिया नावाने नंबर असलेला 8269261132 वापरकर्ता, संध्या राणी वड्डाडी नावाने नंबर असलेली 9601810323 वापरकर्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला एक लिंक पाठवली. त्यावरून IIFLPRO हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये ट्रेडिंगवर पैसे गुंतविल्यास चांगला फायदा करून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेकडून 26 लाख 61 हजार रुपयांची गुंतवणूक घेत त्यांना कोणताही मोबदला अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.