ट्राफिक बडी सोडवणार आता वाहतुकीची समस्या

0
39

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोबाईल क्रमांक जाहीर
अंमलबजावणी लवकरच, पोलीस आयुक्तांची माहिती

दि . १७ ( पीसीबी ) – वाहतूक कोंडी, खराब रस्ते, सिग्नल यंत्रणा बंद, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अस्ताव्यस्त पार्किंग अशा तक्रारी नागरिकांना आता थेट वाहतूक पोलिसांना करता येणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्राफिक बडी हा उपक्रम हाती घेतला आहे. ८७८८६४९८८५ या क्रमांकावरून नागरिकांना वाहतुकीशी संबंधित तक्रारी करता येणार आहेत. या उपक्रमाची लवकरच अंमलबजावणी सुरु केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ऑनलाईन चलन करणे सुलभ होणार आहे. नागरिकच पोलिसांचे सीसीटीव्ही म्हणून काम करतील, असा विश्वास देखील आयुक्त चौबे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, ट्राफिक बडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोजन (एप) याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक पोलीस आणि पिंपरी-चिंचवड मनपाने लहान मोठ्या ८० चौकांची पाहणी केली. यामध्ये २५ चौकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ट्राफिक बडी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी ८७८८६४९८८५ हा क्रमांक प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकावर व्हाट्स अप चॅट बॉटच्या माध्यमातून थेट वाहतूक पोलिसांशी संपर्क करता येणार आहे. त्यामध्ये रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खराब रस्ता, सिग्नल यंत्रणा बंद, अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्यात मधोमध बंद पडलेली वाहने, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी वाहने अशा विविध तक्रारी छायाचित्रासह वाहतूक पोलिसांकडे करता येणार आहेत. ही तक्रार करताना वेळ आणि ठिकाण नमूद करावे लागणार आहे.

रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भातील माहिती संबंधित शासकीय संस्थेकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरही रस्ता न दुरुस्त झाल्यास महिन्याच्या अखेरीस पुन्हा पाठपुरावा केला जाईल. संबंधित संस्थेशी समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून सातत्याने तक्रारी येणारी ठिकाणे निदर्शनास येतील. त्यावर तोडगा काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाईल. याबाबतची नियमावली तयार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आयुक्त चौबे यांनी सांगितले.

ट्राफिक बडी चा असा करता येईल वापर

ट्राफिक बडी साठी कोणतेही एप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा ८७८८६४९८८५ या व्हाट्स अप क्रमांकावर उपलब्ध आहे. व्हाटस अपवरून या क्रमांकावर हाय अथवा हॅलो मेसेज केल्यास पुढील संवाद साधता येईल. दिलेल्या पर्यायांमधून नागरिकांना त्यांची तक्रार करता येईल. तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची स्थिती, त्यावर केलेल्या उपाययोजना नागरिकांना त्याच क्रमांकावरून समजतील. याची प्राथमिक आवृत्ती (विटा व्हर्जन) सादर केली असून ही सुविधा लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

ज्येष्ठांसाठी उपयोजन (एप)

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोजन विकसित केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका, जवळच्या रुग्णालयांची माहिती, शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. सायबर फसवणूक होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. ज्येष्ठांना तातडीची आवश्यक मदत केली जाणार आहे. लवकरच हे एप कार्यान्वित केले जाणार आहे.

संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या pcpc.gov.in या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. नागरिकांना पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पोलिसांच्या वर्तणुकीचा अनुभव शेअर करता यावे, यासाठी नवीन फीडबॅक फॉर्म तयार केला आहे. भाडेकरुंची माहिती ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. वाहतूक चलन माहिती आणि दंड भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

कोट –
ट्राफिक बडी हा उपक्रम लोकेशन बेस आहे. त्यामुळे तक्रारदाराला खोटी माहिती देता येणार नाही. तसेच तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मिळेल. वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांना या माध्यमातून सूचना करता येतील. स्थानिक परिसरातील वाहतूक बदलाची माहिती देखील या माध्यमातून नागरिकांना मिळेल. असा उपक्रम करणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय आहे.

  • विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड