टेम्पोची दुचाकीला धडक; 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
444

चाकण, दि. २६ (पीसीबी) – चौकातील सिग्नल सुटल्याने रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 25) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडला.

समर्थ सुनील लोंढे (वय 11, रा. रीदोरी, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ याचे मामा दत्ता सखाराम जगताप (वय 32, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक अमोल लक्ष्मण वाघमारे (वय 23, रा. वाघाळा, कौठा, जि. नांदेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप हे त्यांचा भाचा आणि मुलगी यांना घेऊन दुचाकीवरून चाकण बस स्थानकाकडे जात होते. तळेगाव चौकात सिग्नलला ते थांबले. सिग्नल सुटल्यानंतर ते दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 24/एयु 7207)ने जगताप यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जगताप यांचा भाचा समर्थ हा टेम्पोखाली आल्याने गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.