मुंबई, दि. १९ : मुंबईच्या विलेपार्ले येथील कांबळीवाडी येथील ९० वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महानगरपालिकेने पाडले. या घटनेमुळे देशभरात जैन समुदाय संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या विरोधात आज(१९ एप्रिल) सकाळी ९:३० वाजता अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले.
मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात जैन समाजाकडून करण्यात येत आहे.
केंद्रात भाजपा आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे, त्यानंतर सध्या त्याची जबाबदारी सरकारकडे आहे. मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने व्यवस्थापन समितीला Notice बजावली होती. या विरोधात जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार होती, परंतु त्याआधी बुधवारी BMCच्या पथकाकडून मंदिर पाडण्यात आले.
जैन समाजाच्या वतीने असे म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयानंतर BMC प्रशासनाने कारवाई करायला हवी होती. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केली आहे हे BMC ला माहित होते, परंतु BMC प्रशासनाने घाईघाईने मंदिर पाडले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.