पिंपरी, दि. २० (पीसीबी)-अखंड पुरोगामी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या जल्लोषात विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आज शहरभरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.. सुजलाम सुफलाम असं स्वराज्य निर्माण करणारे आपले छत्रपती शिवराय आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने आपल्या सर्वांना मिळालेला आपला अभेद्य पुरोगामी महाराष्ट्र आज मनुवादी सत्ताधाऱ्यांच्या हातात अडकला आहे.. आज महाराजांनी रक्ताची शिंपण केलेल्या या महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला सर्वसामान्य जनता न्यायापासून व हक्कांपासून वंचित आहे, मनुवादी विचारांनी आंधळं झालेलं राज्यशासन व केंद्रशासन आपला हा शिवरायांचा पुरोगामी महाराष्ट्र गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांची जयंती केवळ एक जल्लोषपूर्ण उत्सव म्हणून नव्हे तर महाराजांचे विचार व संस्कार प्रत्येकाने आपल्या नसानसांत भिनवणे गरजेचे आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांनीच आपण या मनुवादी राक्षसी शासनाचा विरोध करून त्यांना पराजित करू शकतो.. आणि या आणीबाणीच्या लढाई मध्ये जाचक शासनाला धूळ चारण्यासाठी देशाच्या राजकारणातील सर्वोच्च अनुभवी मानबिंदु असलेले आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य जनसमुदाय कटिबद्ध आहोत अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने व्यक्त केली.!
मा. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी यावेळी आजच पुण्यात खराडी येथे पार्किंगच्या वादातून गाडी पेटवत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका महिला भगिणीला गावगुंडांनी पेट्रोल टाकून पेटवल्याच्या संतापजनक घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली, त्याचबरोबर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास सपशेल फेल ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घरून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.. जिजाऊ, सावित्री, रमाईच्या संस्कारांनी घडलेल्या महाराष्ट्रात भाजपच्या मनुवादी शासनाला अजीबात थारा दिला जाणार नाही.. आशा शब्दांत शिलवंत यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला..!
यावेळी भोसरी, लांडेवाडी, पिंपरी, एच. ए. कॉलनी पिंपरी, रहाटनी, जिजामाता हॉस्पिटल पिंपरी, पिंपरी गाव, डांगे चौक चिंचवड, फुगेवाडी आदी ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांना मोठ्या जल्लोशपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, मा. नगरसेवक गणेश मामा भोंडवे, सुलक्षणा ताई शिलवंत, सागर दादा चिंचवडे, विशाल भाई जाधव, विनोद भाऊ धुमाळ, गणेश काळे, प्रतीक जम, सागर वाघमारे, आशिष तायडे, लकी गालफडे तसेच शहरभरातील विविध ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.