दि. 21 (पीसीबी) – उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टामध्ये गौतम अदानी यांच्यासह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा खटला दाखल केला आहे. अदानी यांनी हिंदुस्थानात सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची लाच देऊ केली होती तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असे युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. ‘रॉयटर्स’ने हे वृत्त दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आज शेअर बाजारात अदानी समुहांच्या शेअर्सवरही याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशननने अदानी समुहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊ केल्याचा आरोप लगावला आहे. न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसने गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी, एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे कार्यकारी सिरिल कॅबनेस, अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन, एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे माजी सीईओ रणजीत गुप्ता आणि आणि माजी चीफ सेक्रेटरी रुपेश अग्रवाल यांच्यावर फौजदारी आरोप दाखल केले आहेत. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्टचे उल्लंघन करून लाचखोरीचा कट रचल्याचा आरोपात समावेश आहे.
अदानी आणि त्यांच्या कंपनीतील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऊर्जा कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्स देण्याचे निश्चित केले होते. या कंत्राटामुळे कंपनीला आगामी 20 वर्षांमध्ये 2 अब्ज डॉलर्सहून अधिक नफा होण्याचा अंदाज होता. लाचेचे पैसे जमवण्यासाठी अमेरिकेसह विदेशातील गुंतवणूकदारांची आणि बँकांची फसवणूक केल्याचा आरोप अदानींवर लावण्यात आला आहे. कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अदानी समुहाने 3 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जे आणि रोखे जमा केल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. याच आरोपांतर्गत त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी अदानी किंवा अदानी समुहाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय आहेत आरोप?
– 2020 ते 2024 दरम्यान अदानीसह सर्व आरोपींनी सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची लाच देऊ केली होती. या कंत्राटामुळे कंपनीला आगामी 20 वर्षांमध्ये 2 अब्ज डॉलर्सहून अधिक नफा होण्याचा अंदाज होता.
– याबाबत अदानी यांनी एका हिंदुस्थानी अधिकाऱ्याची भेट घेतली. तर सागर अदानी आणि विनित जैन यांनी यावर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या.
– सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांनाही यात आरोपी बनवण्यात आले आहे. या चौघांनीही लाचखोरीच्या योजनेमध्ये ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचा तपास थांबवण्याचा कट रचला होता. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विष्लेषणं डीलिट केली.
– अदानी ग्रीन एनर्जीने कंत्राटासाठी निधी देण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून 3 अब्ज डॉलर्स जमा केले.
– सदर प्रकरणात सहभागी असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदानी यांना ‘न्युमेरो युनो’ आणि ‘द बिग मॅन’ या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदानीने आपला मोबाईल फोन वापरला होता.