गाडीचा अर्धवट उघडा दरवाजा बेतला 3 वर्षाच्या मुलावर

0
225

आकुर्डी ,दि.२२(पीसीबी) -हलगर्जीपणे गाडीचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवणे एका 3 वर्षाच्या मुलाच्या जिवावर बेतले आहे. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (दि.21) घडलेल्या अपघातात 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शिवेंद्र आदेश विचारे (वय 3) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकऱणी मुलाच्या वडिल आदेश विष्णू विचारे (वय 42 रा.निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिंद्रा सुप्रो (एमएच 14 केए 6409) व बोलेरो पिकअप (एमएच 14 केए 8267) यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून खंडोबा माळ येथील खंडोबाच्या दर्शनाला त्यांच्या मुलगा व मुलगी हिच्यासह जात होते. यावेळी महिंद्रा सुप्रो गाडीच्या चालकाने त्याच्या गाडीचा दरवाजा हा अर्धवट उघडाच ठेवला होता. त्या दरवाज्याला फिर्यादीच्या गाडीची धडक बसली. यात गाडीवरील फिर्यादीची मुले रस्त्यावर पडली. यावेळी समोरून वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपचे मागचे चाक शिवेंद्रच्या अंगावरून गेले. यात शिवेंद्र चा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही वाहन चालक तेथे न थांबता तेथून पळून गेले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.