कामगार रुग्ण व कुटुंबियांसाठी रेफरल नोट पुन्हा सुरू करा अन्यथा टाळे ठोकू..!

0
75

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगार सेलचा ईएसआय विभागाला इशारा..!

पिंपरी , दि. 12 जुलै (पीसीबी) – केंद्र शासनाने राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत चालणाऱ्या ईएसआय रुग्णालय मोहन नगर चिंचवड येथील रुग्णालयामार्फत कामगारांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारार्थ दिल्या जाणाऱ्या रेफरल नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या अडचणीत आले असून त्यांच्या आरोग्याचा व उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेल च्या वतीने शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली ईएसआय रुग्णालय चिंचवड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे यांना निवेदन देऊन हे रेफरल नोट पूर्ववत दिले जावेत अन्यथा शहरभरात तीव्र आंदोलन करत ईएसआय कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष संदीप शिंदे, भोसरी विधानसभा प्रमुख सुरेश झावरे चिंचवड विधानसभा प्रमुख राकेश चौधरी पिंपरी विधानसभा प्रमुख दीपक मोंडोंकार यांच्यातर्फे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.