विदेश, दि. २ (पीसीबी) – इस्राइल देशाला पॅलेस्टाइनच्या जमीनीवर आजिबात जागा नाही. या देशाचं अस्तित्वच अतार्किक आहे. इस्राइलच्या अस्तित्वामुळे अरब आणि इस्लामिक देशांमध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याचं अस्तित्व नष्ट करणं गरजेचं आहे; असं मत हमासच्या पॉलिटिकल ब्युरोच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.
गाझी हमाद असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याने LBC या लेबनीज टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. “7 ऑक्टोबरचा हल्ला ही केवळ पहिली वेळ होती. इस्राइलला धडा शिकवण्यासाठी असे आणखी हल्ले आम्ही करत राहू. आम्हाला याची किंमत चुकवावी लागली तरी चालेल. आम्हाला शहीदांचा देश म्हटलं जातं, आणि आम्ही अभिमानाने आणखी हुतात्म्यांचा बळी देऊ”; असंही हा अधिकारी म्हणाला.
गाझा पट्टी, वेस्ट बँक आणि इस्राइल वगळता गोल्डन हाईट्स हा भूभाग म्हणजे ‘पॅलेस्टाईन लँड्स’ असल्याचं हमासचं म्हणणं आहे. यापैकी बराच भूभाग ताब्यात घेण्याचा इस्राइलचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही इस्राइलचंच अस्तित्व नष्ट करणार आहे, असं हमासच्या अधिकाऱ्याने म्हटलं.
“आमच्या भूभागावर इस्राइलने कब्जा केला आहे. आम्ही याठिकाणी व्हिक्टिम आहोत. त्यामुळेच आम्ही जे करत आहोत, त्यासाठी आम्हाला कोणीही जबाबदार ठरवू नये. 7 ऑक्टोबर असो, 10 ऑक्टोबर असो किंवा कोणतेही हल्ले असोत.. आम्ही जे करत आहोत ते न्याय्य आहे”; असंही गाझी पुढे म्हणाला.
हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांबाबत विचारलं असता, हमाद म्हणाला की “नागरिकांना मारण्याचा आमचा हेतू नव्हता, मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवर काही अडचणी आल्या”.
सात ऑक्टोबरचा हल्ला
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर मोठा हल्ला केला होता. यावेळी इस्राइलवर तब्बल 5 हजार क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. तसंच हमासचे सुमारे तीन हजार दहशतवादी इस्राइलच्या सीमेतून आत शिरले होते. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा केली होती.











































