आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

0
89

मावळ, दि. ७ –
रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार रॅली काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मावळ तालुक्यातील आढले खुर्द आणि चांदखेड येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान नियमांचा भंग केला.

दीपक भाऊराव राक्षे (वय ५३, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमदार सुनील शेळके (वय ४५) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ नामदेव दाभाडे यांनी मंगळवारी (दि. ५) आढले खुर्द आणि चांदखेड या गावांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन केले होते.

त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार रॅलीला परवानगी दिली होती. ही रॅली रात्री दहा वाजल्यानंतर शिरगाव ते सोमाटणे यादरम्यान काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचारास बंदी असताना देखील ही रॅली काढण्यात आली. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत रॅली सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार पारखे तपास करीत आहेत.