आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार शिधापत्रिका..

0
94

सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही..

नेटवर्क समस्यामुळे पावसाळ्यात धान्य वाटपास ऑफलाईन परवानगी हवी..

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांची मागणी…

पिंपरी, दि. २४
राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई-शिधापत्रिका (ई-रेशनकार्ड) मिळणार आहेत. त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही. या शिथापत्रिका ऑनलाइन अर्ज करून उपलब्ध होणार आहेत. मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर या शिधापत्रिका आपल्याला डाऊनलोड करून ठेवता येणार आहे; तसेच गरज पडेल तेव्हा त्याची प्रिंटआऊटदेखील आपण घेऊ शकतो. विशेष बाब म्हणजे ही ई-शिधापत्रिका निःशुल्क मिळणार आहे. त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. त्याचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या लाडकी बहीण योजना, उत्पन्न दाखले, शाळा-कॉलेज अ‍ॅडमिशन, रुग्णालये, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना आदी ठिकाणी शिधापत्रिकेची मागणी केली जाते. नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयाचा उंबरठा झीजवावा लागत असे. तसेच नागरिकांची आर्थिक लुट देखील होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राथान्य कुटुंब योजनेतील (पीएचएच) शिधापत्रिकाधारक तसेच, राज्य योजनेच्या (एपीएल) शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (एनपीएच), एपीएल शेतकरीव्यतिरिक्त तसेच एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा सर्व रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका मोफत मिळणार आहे. अर्जदारांनी या शिधापत्रिकांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ई-शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांनी https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. होमपेजवर लॉग इन करावे. विनंती केलेली सर्व माहिती भरावी. कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावा. याद्वारे नवीन शिधापत्रिका, पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत Public Login वर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.

” नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी लोकांची रेशनिंग कार्यालयात गर्दी वाढत आहे. नागरिकांनी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन पब्लिक लॉग इन करून शिधापत्रिकाविषयक कामे करून घ्यावीत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे रेशन दुकानदारांना नेटवर्कच्या अडचणी जाणवत आहेत. धान्य वाटप करताना सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शासनाने चार महिन्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपास परवानगी द्यावी. ई-शिधापत्रिका सुविधेचा शंभर टक्के वापर व्हायला हवा. त्यासाठी यापुढील काळात जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करावी. पर्यायाने, सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल.” – मा. विजय गुप्ता, खजिनदार – ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन…