वायसीएमच्या दारात थांबलेला एक श्वास आणि व्यवस्थेवर लागलेले प्रश्नचिन्ह

PCB Admin
3 Min Read
  • अमोल शिंदे

छातीत अचानक कळ उठते, अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात आणि अशा आणीबाणीच्या क्षणी उपचारांची शेवटची आशा म्हणून एका कर्तव्यदक्ष पोलीस हवालदाराला आमचा मित्र जावेद बागसीराज याला शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले जाते. तिथे ईसीजी काढला जातो, पण त्यानंतर जे उत्तर मिळते ते काळजाचा ठोका चुकवणारे असते: “इथे आयसीयू बेड शिल्लक नाही, तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात घेऊन जा.”
हॉस्पिटलच्या दारातून बाहेर काढत असतानाच व्हीलचेअरवर त्या खाकी वर्दीतल्या सक्षम मित्राची मान अचानक एका बाजूला कलंडली आणि एका निष्पाप सहकाऱ्याने प्राण सोडले. एका पोलीस हवालदाराचा अशा पद्धतीने व्यवस्थेच्या दारात तडफडून मृत्यू होणे, हे केवळ दुर्दैवी नसून संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.

आज मनाला पिळवटून टाकणारा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या शहराला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मिरवले जाते, त्या महापालिकेच्या मध्यवर्ती आणि सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयातून एखाद्या गंभीर रुग्णाला उपचारांअभावी बाहेर पाठवण्याची वेळ का येते?

जर शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयातच आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि पुरेशा जीवनरक्षक यंत्रणांची वानवा असेल, तर या अफाट बजेटचा आणि विकासाच्या गप्पांचा सामान्य नागरिकाला काय फायदा?

दररोज सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यात होणारे वाद, वादावादी आणि संघर्ष सर्वांना दिसतात. अनेकदा या वादांचे पर्यवसान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये होते. त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी, डॉक्टरांचे संरक्षण करण्यासाठी जेव्हा पोलीस धावून जातात, तेव्हा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या याच पोलिसांवरही हल्ले होतात. अशा वेळी गुन्हा दाखल होतो, हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई केली जाते, गुन्हे नोंदवून फाईली बंद केल्या जातात. पण कधी विचार केला आहे का, की या संघर्षाच्या मुळाशी काय आहे?

या सर्व उद्रेकाचे मूळ कारण रुग्णालयांमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नसणे, अपुरा कर्मचारी वर्ग आणि अत्यंत संवेदनशील क्षणी नातेवाईकांना विश्वासात घेऊन खरी माहिती देणाऱ्या संवाद यंत्रणेचा संपूर्ण अभाव हेच आहे.
आपण नेहमी रोगावर उपचार न करता लक्षणांवर मलमपट्टी करत बसतो. समस्येच्या मुळाशी कोणीही हात घालत नाही. हॉस्पिटलमध्ये वेळेवर बेड वाढवणे, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची तातडीने पुरेशी भरती करणे, आणीबाणीच्या जीवनरक्षक सुविधा सज्ज ठेवणे आणि प्रशासनाची स्पष्ट जबाबदारी (Accountability) निश्चित करणे या प्राथमिक गरजा आहेत. रुग्णाच्या स्थितीबाबत नातेवाईकांना संवेदनशीलतेने आणि वेळीच वस्तुस्थिती समजावून सांगितली, तर अर्धे तणाव तिथेच निवळतील आणि होणारे अनर्थ सहज टाळता येतील.

आज कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या एका कर्तव्यनिष्ठ पोलिसालाच उपचारांअभावी जीव गमवावा लागला. जर जनतेच्या रक्षणासाठी २४ तास तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांवर ही वेळ येत असेल, तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची?

केवळ शोक व्यक्त करून किंवा चौकशीचे कोरडे आदेश काढून आता चालणार नाही. प्रशासनाने समस्येच्या मुळावर उपचार करावेत, आरोग्य यंत्रणा सक्षम करावी आणि वायसीएमसारख्या रुग्णालयांना खऱ्या अर्थाने सक्षम करावे, जेणेकरून कोणत्याही नागरिकाचा किंवा पोलिसाचा श्वास असा व्यवस्थेच्या उंबरठ्यावर अडखळणार नाही.

Share This Article