यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार श्री. मानव कांबळे यांना प्रदान….
निवृत्तीनंतरची ‘तिसरी इनिंग’ समाजकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी द्यावी; पर्यावरण संवर्धनात ज्येष्ठांनी सक्रिय व्हावे
मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे करण्याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमास न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर आपण मानसिकदृष्ट्या ज्येष्ठ झालो असून सार्वजनिक जीवनातूनही निवृत्त झालो आहोत, असा न्यूनगंड ज्येष्ठांनी बाळगू नये. साठीनंतरची ‘तिसरी इनिंग’ ही देशकार्य, समाजकार्य आणि सर्जनशील कार्यासाठी द्यावी, असे आवाहन न्यायमूर्ती ओक यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला अनुभव, ज्ञान आणि कौशल्य समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून त्याचा उपयोग पुढील पिढीच्या घडणीत व्हावा, असेही त्यांनी सांगितले.
पर्यावरण बदलाचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही न्यायमूर्ती ओक यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पिढ्यांमधील वाढते अंतर म्हणजेच ‘जनरेशन गॅप’ कमी करण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी परस्परांना समजून घेण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी केवळ ज्येष्ठांच्याच सहवासात न राहता तरुणांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत. तरुणांनीही ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आदर करावा. अशा संवादातून पिढ्यांमधील दरी कमी होऊन समावेशक समाजाकडे वाटचाल करता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रकाश घादगिने लातूर, बबन पाटणकर ठाणे, भागीरथी बच्चेवार नांदेड, वृषाली मगदूम रायगड, मानव कांबळे पुणे , जनसेवा फौंडेशन,पुणे आणि ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा, जळगाव यांचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उदय रामदास आणि मृण्मयी फाटक यांच्या नादब्रह्म टीमच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पार्किन्सन्स आजाराविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटाचारी यांनी पार्किन्सन्स आजाराची लक्षणे, त्यावरील नियंत्रण आणि ज्येष्ठांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या माध्यमातून दीर्घकाळ सक्रिय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मा. सुरज भोईर यांच्या प्रार्थनेने झाली, या कार्याक्रमचे प्रास्ताविक मा.विभगाचे संयोजक मा. विजय कान्हेकर यांनी केले यावेळी त्यांनी सेंटच्या वतीने चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. त्यानंतर निवड समितीच्या वतीने मा. Adv. प्रमोद ढोकले यांनी प्रातिनिधिक विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार विभागचे प्रमुख दीपिका शेरखाने यांनी केले. तसेच मा. प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनिषा खिल्लारे, वंदना वाळीकर , मीनल सावंत, प्रशांत इखर, अशोक जाधव, सुरज पवार, यांनी अथक श्रम घेतले.

