इराण युद्धावर ट्रम्प यांची बदलती भूमिका;जगातच नव्हे तर अमेरिकेतही ट्रम्प ठरले हास्यास्पद

1 Min Read

दि.०६(पीसीबी) – मध्यपूर्वेतील युद्धाला एक महिना उलटून गेला असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे जगभरातून तीव्र टीका होत आहे. इराणविरोधातील संघर्षात वारंवार बदलणाऱ्या विधानांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर अमेरिकेतही राजकीय नेते आणि नागरिक ट्रम्प यांच्या नेतृत्वावर संशय व्यक्त करत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अमेरिकेतील वरिष्ठ नेतेही आता उघडपणे त्यांच्यावर टीका करत आहेत.

काँग्रेस सदस्य जेक ऑकिनक्लॉस यांनी ट्रम्प यांच्या निर्णयांवर कडक शब्दांत टीका करत, इराणवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तसेच, स्वतःहून युद्ध सुरू करून पराभव पत्करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची नोंद इतिहासात होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे अमेरिकेची जागतिक प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ज्येष्ठ सिनेटर बर्नी सँडर्स यांनी ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांना “धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीचे विधान” असे संबोधले. ईस्टरसारख्या पवित्र दिवशी अशा प्रकारची वक्तव्ये करणे अत्यंत अशोभनीय असल्याचे ते म्हणाले. तसेच, हे युद्ध तातडीने थांबवण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेल्या दबावामुळे अमेरिकेच्या नेतृत्वावर आणि परराष्ट्र धोरणाच्या दिशेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Share This Article