इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन वैमानिकाची थरारक सुटका

1 Min Read

दि.०६(पीसीबी) – मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील वैमानिकाची अमेरिकेने अत्यंत धाडसी आणि थरारक बचाव मोहीम राबवत यशस्वी सुटका केली आहे.माहितीनुसार, इराणने अमेरिकन हवाई दलाचे F-15E स्ट्राईक ईगल विमान दक्षिण इराणमध्ये पाडले होते. या विमानात एक पायलट आणि एक वेपन सिस्टम ऑफिसर असे दोन क्रू मेंबर्स होते. विमानाला आग लागण्यापूर्वी दोघांनी यशस्वीपणे इजेक्ट केले. त्यापैकी पायलटची काही तासांत सुटका करण्यात आली, मात्र दुसरा सैनिक इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात अडकला होता.

हा सैनिक सुमारे एक दिवस शत्रूच्या तावडीत सापडण्याच्या भीतीत लपून राहिला. अखेर अमेरिकन सैन्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत सुरक्षित बाहेर काढले.

या मोहिमेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती देताना सांगितले की, “ही अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी ‘सर्च अँड रेस्क्यू’ ऑपरेशन्सपैकी एक आहे. आमच्या सैनिकाने शत्रूच्या प्रदेशात लपून स्वतःचा बचाव केला.”

या बचाव मोहिमेत अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ने महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी वैमानिक आधीच सापडल्याची अफवा पसरवण्यात आली. तसेच, त्याचे अचूक लोकेशन शोधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

बचाव कारवाईदरम्यान अमेरिकन स्पेशल फोर्सेसने जोरदार हवाई संरक्षण देत, गरजेनुसार एअरस्ट्राइकचा वापर करून हा धाडसी ऑपरेशन यशस्वी केले.या संपूर्ण घटनेमुळे अमेरिकन सैन्याची तयारी, तंत्रज्ञान आणि आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Share This Article