मुंबई, दि. ५ : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या या सातत्याने होत असतात. मात्र, काही महत्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाल्यास त्याची राज्यभर चर्चा होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या आयुक्तपदावरुन डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना पुणे महानगर विकास प्राधिकरणावर पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राज्याचं अल्पसंख्या विभागही गेल्या काही दिवसांत चर्चेत होते. येथील सचिवपदीही नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करून मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश म्हसे हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
डॉ. अभिजीत चौधरी यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली, ते 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चौधरी यांच्याकडे आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. सदर बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहेत, असे बदली आदेशात म्हटले आहे.












































