जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी

0
19


दि. 16 (पीसीबी) नागपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. नागपूर विमानतळावर 3 वाजून 36 मिनिटांनी (पहाटे) एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना ही धमकी देण्यात आली. स्वत: सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे. अंधारेंनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. आपली 7 वर्षांची लेक सोबत असतानाच हा सर्व प्रकार घडल्याचं सांगत त्यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं याचं सविस्तर वर्णन केलं.

नेमकं काय म्हटलं आहे सुषमा अंधारेंनी ?

परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे . अशातच आत्ता तीन वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. मी, माझी सात वर्षांची लेख आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्ध्या टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. देवेंद्रजी,
आपण आपला यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूपदा वाटले. मात्र दहशत आणि दबाव तंत्राचे हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले.

#टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.