बावनकुळेंसह सहा आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द

0
39

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अशातच एक मोठी बातमी’ही समोर आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा आमदारांचे विधान परिषदेत सदस्यत्व रद्द झाले आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपचे गोपीचंद पडखळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली. शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. तसेच भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला. त्यामुळं नियमानुसार त्याच वरील सभागृहतील सदस्यपद रद्द केलं असून, सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे.