‘अमित शाह बंद दाराआडचे धंदे सोडा, हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना चॅलेंज

0
65

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर सडकून टीका केली. “ज्याला मी बाजारबुनगा म्हटलं ते आठ-दहा दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. कोण येऊन गेले? त्यांचं दुर्दैवं असं आहे की? दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात येऊन गेले, थोड्या दिवसांत माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम. ठोकलं तिकडे. ते तिकडे मला म्हणाले होते की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे संस्थापक. मी औरंगजेब फॅनक्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अब्दाली आहात, अहमद शाह अब्दाली. चार दिवसांपूर्वी नागपुरात येऊन गेले. बंददाराआड चर्चा. काय चर्चा? उद्धव ठाकरेला संपवा. शरद पवारांना संपवा. त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बुथ लेव्हलचे कार्यकर्ते फोडा. अहो, अमित शाह हे बंद दाराआडचे धंदे सोडा. हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करुन दाखवा?”, असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“जे मी पुण्यात बोललो होतो, हे बाजार बुनगे येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा? अरे संपवायचं असेल तर या. तुमच्या किती पिढ्या उतरतात ते मी बघतो. शिवसेना का संपवायची? आम्ही तर तुमच्याचबरोबर होतो. आज माझ्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आहेत. पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना? आम्ही 25 ते 30 वर्षे हिंदुत्वच्या मुद्द्यावरुन सोबत राहिलो. मग 2014 मध्ये दिल्लीत तुमचा पंतप्रधान बसल्यावर काय झालं होतं?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाहीत. बोलतात काय आणि करतात काय, जातात कुठे. त्यांनी युती तेव्हा तोडली होती. त्यांनी 2019 साली देखील तेच केलं. 25 ते 30 वर्षात तुमच्यासोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्यावर काँग्रेस कसा होणार? म्हणजे माझ्यासोबत असला की साधू संत. दुसऱ्याकडे गेला तर चोर. हे तुमचं हिंदुत्व कुठलं. भाजपचं हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा. पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का? भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतलं जात आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.