नागपूर, दि. १४ (पीसीबी) – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील 10 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून सलग तसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकासकाम आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी, या मागणीसाठी सर्वसामान्य नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत. हातात नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत? अशा आशयाचे बॅनर घेत नागपूरकरांनी ही मोहीम राबवली आहे.
नागपुरकरांनी जाहीर केला आपला कौल?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात नागपूरचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील 20 नेत्यांचा समावेश आहे. काल, 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या या यादीत नितीन गडकरी यांचे नाव येताच नागपूर भाजपमध्ये मोठ्या उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. काल शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांनी नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर वाजतगाजत स्वागत केले. असे असताना नागपूरातून नितीन गडकरींच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल या बाबत अद्याप कुठलेही नाव पुढे आलेले नसतांना नागपूरकरांनी आपला कौल जाहीर करून टाकल्याचे बघायला मिळत आहे.
नितीन गडकरींमुळे नागपूरात अनेक संस्था आल्या, विकासाची मोठी कामं झाली, यासह त्यांनी देशभरात केलेली विकासाची कामे बघता विकासाच्या आड राजकारण कधीही येऊ न दिल्याने त्यांची प्रतिमा देशभर विकासपुरुष अशी आहे. त्यामुळे राजकरणांपेक्षा विकासाला सर्वस्वी मानणाऱ्या नितीन गडकरी यांची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी मागणी नागपूकरांनी केली आहे.
नागपूरातील इतर विरोधीपक्षानी नितीन गडकरी यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार उभा न करता देशात एक नवा आदर्श उभा करावा. तसेच विकासासोबत सर्वसामान्य जनता कायम उभी असते, हा संदेश देखील या माध्यमातून द्यावा, अशी आग्रही मागणी नागपूकरांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरकर रस्त्यावर उतरून मोहीम राबवत आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य चौकात हातात ‘नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही, असा आशय असलेला बॅनर घेत आपली भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती देखील या नागरिकांनी या मोहिमेतून केली आहे.