NEET परीक्षेत कमी मार्क पडल्याने वडिलांनी पोटच्या मुलीचा घेतला जीव

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि . २३ ( पीसीबी ) – NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापक वडिलांनी आपल्या १७ वर्षांच्या मुलीला लाकडी खुंट्याने अमानुष मारहाण केली. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ठरली आहे.

साधना भोसले ही आटपाडीत विज्ञान शाखेत बारावीला शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु नीटच्या चाचणी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे तिच्या वडिलांचा संताप अनावर झाला. साधनाचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनीच आपल्या मुलीला रात्री 9.30 वाजता लाकडी जात्याच्या खुंट्याने बेदम मारहाण केली.

“पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झाला?” – मुलीच्या शब्दांनी पेटला संताप :

साधनानं वडिलांना उत्तर दिलं, “पप्पा, तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना? तुम्ही कुठे कलेक्टर झालात?” तिचं हे उत्तर वडिलांच्या अहंकाराला भिडलं आणि त्यांनी तिला बेदम मारहाण केली. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी तिचे वडील योग दिनासाठी शाळेत गेले होते. घरी परतल्यावर साधना अचेत अवस्थेत आढळली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (NEET Exam Tragedy)

परिसरात हळहळ, समाजात संताप :

साधनाला दहावीत ९५ टक्के गुण मिळाले होते. ती अभ्यासू आणि स्वप्न बाळगणारी मुलगी होती. तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोटच्या लेकीला एवढ्या अमानुषतेने वागवणाऱ्या वडिलांविरुद्ध संतापाचा उद्रेक झाला आहे. 

या प्रकरणी मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना रविवारी अटक केली आहे.

Share This Article