भिडे गुरुजींना कुत्रा कडकडून चावला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.

Share This Article