पार्थ पवार यांचे लग्न कधी ?

2 Min Read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा काल (दि.10) मोठ्या दिमाखात साखरपुडा सोहळा पार पडला. या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. जय पवार यांच्या साखरपुडा सोहळ्याचे काही खास फोटोदेखील सोशल मीडिवार व्हायरल झाले आहेत. दरम्यान, जय पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार मोठे आहेत. तर त्यांचे लग्न कधी? असा प्रश्न माध्यमांमधून उपस्थित केला जात आहे. यावर आता अजित पवार यांनी या प्रश्नावर दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.

अजित पवार पुण्यात बोलत होते. यावेळी माध्यमांनी पार्थ पवार यांचे लग्न कधी? असा प्रश्न उपस्थित केला. यावर पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. “काय आहे ना, जयने त्याचं लग्न ठरवलं. आता पार्थने ठरवलं की त्याचंही करू.” असे उत्तर दिलं. त्यावेळी सर्वत्र एकच हशा पिकला.

जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा पार पडला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला स्वतः अजित पवार शरद पवार यांना गेटवर आणायला गेले होते. या क्षणाची चर्चा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे. अजित पवारांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पार्थ पवार हे २०१९ च्या मावळ लोकसभे उमेदवारी नंतर खूप चर्चेत आले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. राम मंदिराचा निकाल. कलम ३७० चा निर्णयावर पार्थ पवार यांनी जय श्रीराम असे सूचक ट्विट केल्याने त्यांचा कल भाजपकडे असल्याचे स्पष्ट झाले. २०२४ मध्ये पुन्हा पार्थ पवार यांना उमेदवारीचा विषय चर्चेत आला होता. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेत अनिल भोसले यांच्या रिक्त जागेवर पार्थ यांनी पक्षाची उमेदवारी मिळणार अशीही चर्चा होती. भाजप आणि अजित पवार यांचे सूत जुळल्याने समिकरणे बदलली. बारामतीतून पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि पुढे राज्यसभेवर त्यांना संधी मिळाली. शिरूर लोकसभा पार्थ पवार लढणार अशाही वावड्या उठल्या होत्या. उच्चशिक्षित असलेले पार्थ पवार हे अधूनमधून पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात लक्ष घालत असल्याने दादांची धुरा आता पार्थ पवार सांभाळणार असेही सांगितले गेले.
दरम्यान, पार्थ यांच्या लग्नावर आता चर्चा रंगली आहे. धाकटे भाऊ जय पवार यांचे लग्न जमले आणि साखरपुडाही झाला. आता थोरल्या पार्थ पवार यांचे काय, अशी विचारणा होत आहे.

Share This Article