विलासराव देशमुखांचे सुपुत्र भाजपच्या मार्गावर

2 Min Read

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) : येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठमोठे नेते येणार आहेत, महाविकास आघाडीतील नेत्यांचा पूर्ण पक्ष रिकामा होईल, शिवसेनेचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादमध्ये केला. लातूरमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चेवर उत्तर देताना बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलं.

सगळे जण भाजपामध्ये येतील, यात बरीच मोठमोठी नावं आहेत, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असेही बावनकुळे म्हणाले.दुसरीकडे, भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ‘लातूरचे प्रिन्स – अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा निर्माण झालीये. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, ते पक्षात आलेलं भाजप कार्यकर्त्यांना बिलकुल रुचणार नाही’ असं म्हणत निलंगेकरांनी देशमुखांना विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवरील नाशिक पदवीधर मतदारसंघामधून राजेंद्र विखे इच्छुक आहेत, भाजप सकारात्मक आहे आणि आज दुपारपर्यंत तुम्हाला बातमी देऊ, असंही बावनकुळे म्हणाले.विधान परिषद निवडणुकीतून शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही, मी रोज एकनाथ शिंदेंसोबत बोलतो, सगळ्यांना बोलूनच उमेदवार अंतिम होताय. धुसफूस आमच्यात नाही तर महाविकास आघाडीत आहे. नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले आहेत, ते भांडताय, आमच्यात पूर्ण समन्वय आहे, असा दावा बावनकुळेंनी केला.

Share This Article