मी बोलले तर कुठे बिघडलं? अंजली दमानिया यांचा राज ठाकरेंना मेसेज

0
479

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद एवढेच नाही तर ज्या पक्षाची ग्रामपंचायतमध्ये सत्ता नाही मात्र तरीही लोकांच्या मनात हुकूमत गाजवणारे महाराष्ट्राचे व्यक्तीमत्तव राज ठाकरे यांना ईडी चा समन्स आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते कावरे बावरे झाले होते. समन्स नंतर तात्काळ त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. परंतू राज ठाकरे यांनी आंदोलन न करण्याची सक्त ताकीद कार्यकर्त्यांना दिली होती.

तसेच कार्यकर्त्यांनीही राज यांच्या आदेशाचे  पालन केले. शांततेत कृष्णकुंजवर ते आपल्या साहेबांच्या येण्याची वाट पाहत होते. परंतू, सकाळी राज ठाकरे कुटूंबियांसोबत ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले, असता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून लगेच राज ठाकरे ईडीच्या चौकशीला चालले आहेत की सत्यनारायणाच्या पुजेला असा टोला लगावला होता. त्यांच्या या विधानावर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर त्यांचा समाचार घेतला. त्यानंतर दमानिया यांनी राज ठाकरे यांना मेसेज केला आहे. या मेसेजमध्ये अंजली यांनी मनसे कार्यकर्त्यांची तक्रार केली आहे.

नमस्कार मी सौ अंजली दमानिया, आज मी आपल्याविरुद्ध एक ट्वीट केले की, ‘आपण ईडीच्या चौकशीला निघालात की सत्यनारायणाच्या पूजेला’, यावर मला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केले, तुम्ही देखील तुमच्या भाषणात अनेकांची टिंगल उडवता. मग मी बोलले तर कुठे बिघडले? मी लोकशाहीत राहते, मला माझी मते मांडण्याचा अधिकार आहे, माझ्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपल्याला काय वाटते ते कळवावे, असा मेसेज अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंना केला आहे.