‘आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल, संपर्क-हिंजवडी पोलिस’; पैसे जमीन पाहून ठरवले जातील  

0
868

भाजप नगरसेवकाच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

पुणे, दि. २० (पीसीबी) – आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल ! संपर्क-हिंजवडी पोलिस (पैसे जमीन पाहून ठरवले जातील) अशा आशयाची पोस्ट पुणे महापालिकेचे भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.    

हिंजवडी पोलिस कायमच कोणत्या कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. यावेळी मात्र, राज्यात व महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकाने हिंजवडी पोलिसांवर गंभीर आरोप केल्याने पोलिसांच्या कार्यशौलीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या पोस्टला वसंत मोरे यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की,  “जेव्हा तुमच्या सारखा पुणे शहर सुधारणा समितिचा जबाबदार अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असे आरोप करतो, तेव्हा बाब गंभीर आहे आणि हो हे गृह खाते मा. मुख्यमंत्री साहेबांकडे आहे.” तर मिलींद शिंत्रे म्हणाले,  “सर, तुम्ही इतके हतबल असाल, तर आमच्या सारख्या सामान्य माणसांच तर मरणच होईल, या सरकारी अधिकाऱ्यांना कशाची भीतीच राहिली नाही.”

सत्ता कोणाचीही असो पोलिस तेच

प्रत्युत्तर देताना नगरसेवक बालवडकर म्हणाले, “सत्ता कोणाचीही असो पोलिस प्रशासन तेच असते, पोलिसच गुंड झाले तर खरच अवघड होईल ! हे असच चाललंय सगळीकडे. महसूल आणि भूमिअभलेख अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही लोक ही सगळी कामे करत आहेत. यात पैसा सोडणाऱ्यांचा, धनाढ्य आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांची सरशी होते. सामान्य माणसाचे काही एक चालत नाही.

पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करा

दरम्यान, बालवडकर यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंजवडी येथे दि. १८ सप्टेंबर रोजी साखरे कुटुंबियांवर हिंजवडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकविण्यासाठी लँड माफियांना त्यांचा एजंट म्हणून मदत केली. तसेच साखरे कुटुंबियांना गुन्हा दाखल करून अटक कारण्याची धमकी देणे, धक्काबुक्की करणे, दरम्यान आरोपीने विक्रम साखरे यांच्या डोक्यात वीट फेकून मारली. तरी निर्दयीपणे ‘रडरड’ म्हणणे, हे म्हणजे पोलिस खात्यातील गुंडगिरीचे उत्तम उदाहरण आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी पैसे घेऊन जमीन बळकविण्यासाठी आपल्या अधिकाराचा व शासकीय पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला. असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

“सदर पोस्टबाबत माहिती मिळाली. मात्र, या संदर्भात कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. असे प्रकार कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत रितसर तक्रार दिल्यास त्याची चौकशी केली जाईल.”

  • श्रीकांत मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त