चिखलीत उभारले जाणार १०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र

0
722
संग्रहित छायाचित्र
  • १२२ कोटी खर्चास स्थायी समितीची मान्यता

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चिखली येथे १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यासाठी व त्याच्या १० वर्ष संचलन आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या सुमारे १२२ कोटी रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

पिंपरी चिंचवड शहर हे देशातील वेगाने विकसित होणारे अग्रगण्य शहर आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या मागील तीन दशकांमध्ये सन १९९१ – १०७ टक्के, २००१ – ९३ टक्के व २०११ – ७२ टक्के अशी वाढलेली आहे. इतर शहराच्या तुलनेत शहराची लोकसंख्या वाढीचा दर सर्वसाधारणपणे दुप्पट आहे. सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर व विकासाचा वेग व भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात इतर अत्यावश्यक सेवा सुविधांसोबतच आवश्यक व योग्य प्रमाणातच पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

शहरासाठी दिर्घकालीन पाण्याचे नियोजन करण्याचे दृष्टीने महापालिकेने केलेली मागणी विचारात घेऊन राज्य शासनाने आंद्रा व भामा आसखेड धरणातून अनुक्रमे ३६.८७० दलघमी (१०१.०१ दललि प्रतीदिन) व ६०.७९१ दलघमी (१६६.५५  दललि प्रतीदिन) असे एकूण २६७.५६ द.ल.लि. प्रतीदिन पाणी कोटा आरक्षणास मान्यता दिलेली आहे.

त्यास अनुसरून आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणणे व चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व इंद्रायणी खोऱ्यातील नव्याने विकसित होणाऱ्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी व मोशी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा योजना राबविणे नितांत गरजेचे आहे. चिखली येथे ८ हेक्टर क्षेत्र जलशुद्धीकरण केंद्रासाठी मनपाच्या ताब्यात घेण्यात आले असून सदर ठिकाणी ३०० दललि प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे प्रस्तावित आहे. या कामांतर्गत ३०० दललि प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या कामाचे संकल्प चित्र तयार करणे व सध्यास्थितीत १०० दललि प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व पुढील १० वर्षासाठी त्यांचे संचलन व देखभाल दुरुस्ती करणेच्या कामाचा समावेश आहे.