या मतदारसंघात फक्त राष्ट्रवादीतील बंडखोराचाच विजय होतो

0
764

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात एक वेगळी परंपरा असून या मतदारसंघात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणारा उमेदवारच निवडून येतो. २००९ व २०१४ याच्या विधानसभा निकालावरून ते स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील माजी आमदार विलास लांडे यांनी यावेळी राष्ट्रवादीची उमेदवारी न घेता अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, उद्याचा निकालच ही परंपरा कायम ठेवतो की मोडीत काढतो. हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये भोसरी मतदारसंघाची निर्मिती झाली. हा मतदारसंघ शिरूर लोकसभेचा घटक आहे. अनेक छोट्या-मोठ्या गावांचा यात समावेश असून पिंपरी विधानसभेच्या तुलनेत इथं झोपडपट्टीचा परिसर फारच कमी आहे, तर मराठा समाजाचं इथं प्राबल्य आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या परिसरातून इथं अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत.

२००९ साली विद्यमान आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांनी लांडे यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर होऊ घातलेल्या २००९च्या विधानसभेसाठी ही ते तीव्र इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने मंगला कदम यांना तिकीट दिलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या लांडेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. पुढे अपक्ष आमदार झालेले लांडे पुन्हा राष्ट्रावादीत परतले.

२०१४ लोकसभेला अनुत्सुक असणाऱ्या लांडेंनी २०१४ च्या विधानसभेसाठी शड्डू ठोकले होते. त्यामुळे पक्षानेही त्यांनाच तिकीट दिलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष पद मिळालेले महेश लांडगे यांनी ऐनवेळी बंडखोरी केली. तेंव्हा आघाडीत बिघाडी अन युतीत फूट झाल्याने मतदारांनी अपक्ष महेश लांडगे यांच्या बाजूने कौल दिला. अन २००९च्या निकालाची पुनरावृत्ती झाली. सत्तेची समीकरणं पाहत अपक्ष आमदार लांडगे यांनी लांडेंप्रमाणे पुन्हा राष्ट्रवादीत न जाता २१०७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी घरोबा केला. आणि महापालिकेत सत्ता काबीज करण्यात मोलाचा वाटा उचलला.

महेश लांडगे यांची ताकद पाहता भाजपने शिवसेनेकडे असलेला भोसरी मतदारसंघ आपल्याकडे घेत आमदार लांडगे यांनाच महायुतीचा उमेदवार म्हणून तिकीट दिले. मात्र, या उलट राष्ट्रवादीचे तिकीट घेण्यास कोणीच तयार नव्हते. २००९ व  २०१४ विधानसभेचा निकाल पाहता माजी आमदार विलास लांडे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. परंतु, राष्ट्रवादीने लांडे यांना पुरस्कृत केले. पुढे मनसे, काँग्रेस व इतर राजकीय पक्ष, संघटनांनी पाठींबा दर्शविला. दरम्यान, ही निवडणूक घासून झाली असली तरी आमदार महेश लांडगे यांनी विजयाचा दावा केला आहे, तर लांडे यांना अपक्षाची परंपरा कायम राहिल असा विश्वास आहे.