आमदार महेश लांडगे यांना विजयी करण्याचा विविध सामाजिक संघटनांचा निर्धार

864

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहिर केला आहे. जीवनविद्या मिशन, राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड, अविरत श्रमदान एक पाऊल भावी पिढीसाठी, परशुराम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचा त्यात समावेश आहे. महेश लांडगे हे राष्ट्र व समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने हा पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे या संस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जीवनविद्या मिशनने आमदार महेश लांडगे यांना सद्‌गुरुंचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठविल्या आहेत. भोसरी परिसरातील जनसामान्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या आमदार लांडगे यांच्या शुद्ध हेतूला आम्ही सदैव खंबीरपणे साथ देऊ. महेशदादा यांना येत्या विधानसभेत भरघोस यश प्राप्त होवो, अशा सदिच्छा जीवनविद्या मिशनने दिल्या आहेत.

राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस तसेच सचिव श्रीराम परदेशी यांनी संघटनेचा पाठिंबा लांडगे यांना जाहिर केला आहे. समस्त राजपूत संघठन पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने ज्ञानराज मंगल कार्यालय, चिंबळी फाटा येथे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत नुकताच संकल्प मेळावा घेण्यात आला.

यावेळी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते. अविरत श्रमदान एक पाऊल पुढील पिढीसाठी या संस्थेनेही आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. आमदार लांडगे यांनी इंद्रायणी सुधार, पर्यावरणपूरक उद्याने, दिघी येथील दत्त गडावर केलेले वृक्षारोपण या कामगिरीची दखल घेऊन हा पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे अध्यक्ष सुवर्णा भोंगळे यांनी म्हटले आहे.

नामस्मरण भजनी मंडळाचे अध्यक्ष काळूराम देवकर व परशुराम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश नाईक तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना, पिंपरी चिंचवड बार असोशिएशन, शिक्षक संघटना, पीएमपीएमएल इंटक एम्प्लॉईज संघटना, गुजराथी समाज, मारवाडी समाजाचे अध्यक्ष संजय पटनी, बारी समाज, साऊथ इंडियन असोशिएशन, बांधकाम कामगार सेना, सिंधूदुर्ग जिल्हा लोकसेवा प्रतिष्ठान, खान्देशी बहुउद्देशीय युवा मंच, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद समिती, स्वाभिमानी कामगार संघटना, उत्तर भारतीय मित्र मंडळ, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांनीही भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना, शिवसंग्राम संघटना, शिक्षक सेना प्राथमिक संघटना, लोकमान्य श्रमिक कामगार संघटना, यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, सातारा जिल्हा मित्रमंडळ पिंपरी चिंचवड शहर, महाराष्ट्र फेरीवाले क्रांती महासंघ, भगवान सेना पिंपरी चिंचवड शहर, संततुकाराम ज्येष्ठ नागरिक संघ, साऊथ वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड, लहूजी शक्ती सेना, श्री क्षेत्र ओडिसा समाज पिंपरी चिंचवड, अगरवाल समाज संघटना पिंपरी चिंचवड, ज्येष्ठ नागरिक संघटना भोसरी आदी संघटनांनी महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पत्राव्दारे पाठिंबा जाहिर केला आहे.