पिंपरी विधानसभेत जिजाईच्या राख्यांची धूम; पिंपरी विधानसभेतील दोन हजार महिलांना मिळाला स्वयंरोजगार

0
605

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दोन लाख राख्या तयार करण्यात आल्या आहेत. विविध कला-कुसर असलेल्या या राख्या पिंपरी चिंचवड शहरात पहायला मिळत असून त्यामुळे जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेतील दोन हजार महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे.

जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे यांनी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व महिलांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी जिजाई प्रतिष्ठानाच्या वतीने महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर राबविले. रक्षाबंधन सणाला बाजारात राख्यांची मोठी मागणी असते. त्याच अनुशंगाने नगरसेविका सीमा सावळे यांनी महिलांना राखी निर्मिती प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला व त्याला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दोनशे बचत गटातील सुमारे दोन हजार महिलांनी दोन लाख राख्या काही दिवसातच तयार केल्या आहेत. विविध रंगाची फुले, ऊँ, गणपती व रंगीबेरंगी मण्यांचे व खड्यांचे नक्षिकाम असलेल्या या राख्या लक्ष वेधत असून या राख्यांना मागणीही वाढली आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, “महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात. येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पाश्वभुमीवर राखी तयार करण्याचे प्रशिक्षण दिलेल्या महिलांनी दोन लाख राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना मार्केटही मिळाले असून त्यामुळे महिलांना रोजगार मिळाला असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. अशाच पद्धतीने महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत”

यंदा राखी पौर्णिमा व स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी असल्याने जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने खास ‘तिरंगा राखी’ तयार करण्यात आलेली आहे. सीमेवरील सैनिकांना राखी पाठविण्यासाठी या ‘तिरंगा राखी’ ची मोठी मागणी होत आहे. तसेच स्वातंत्र्य दिवस असल्याने आपल्या भावाच्या मनगटावर ‘तिरंगा राखी’  असावी, यासाठी या राखीला मोठी मागणी होत आहे.