नगरसेवक व उद्यान विभागाच्या मदतीने होते झाडांची कत्तल; चोरलेल्या लाकडांचा ट्रकही पोलिसांनी सोडून दिला

901
  • पोलिस व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना कायद्याची माहिती नाही

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग व नगरसेवकांच्या मदतीने शहरातील मोठ्या झाडांची कत्तल सुरू आहे. चिखलीत कत्तल करून लाकडे घेऊन जाणारा ट्रक वृक्षप्रमींनी पोलिसांना पकडून दिला, मात्र, नगरसेवकाच्या दबावामुळे पोलिसांनी तो ट्रक सोडून दिला. ही घटना नुकतीच घडली. त्यामुळे वृक्षतोडीला आत्ता पोलिस खात्याचेही पाठबळ मिळत असल्याने झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वृक्षमित्र हतबल झाले असून झाडे वाचविण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवसेनंदिवस ग्लोबल वार्मिंग वाढत असल्याचे मानवाच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यामधून पर्यावरणाचा समतोल राखणारे व प्राणवायू देणारे झाडेच मानवाला सावरू शकतात. असे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेला व लोकांनी विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींना याचे गांभीर्य नाही. शहराच्या विविध भागात असलेली २० ते ३० वर्षांची मोठी झाडे लाकडांसाठी तोडली जात असून यामधून नगरसेवक व उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना मोठे पैसे मिळत असल्याचे आरोप आहेत.

चिखलीतील कृष्णानगरमध्ये अशाच पद्धतीने मोठे झाड तोडून लाकडे भरत असलेला ट्रक वृक्षप्रमींनी नुकताच पकडला. याबाबत चिखली पोलिसांना सांगितले असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव ट्रक ताब्यात घेतला. मात्र, स्थानिक नगरसेवकाने पोलिसांवर दबाब आणल्याने पोलिसांनी झाडाला इजा केल्याचे तक्रारीत म्हणून अदखपात्र गुन्हा नोंदवून तो ट्रक सोडून दिला. हा ट्रक महापालिकेने वृक्ष छाटणीसाठी नेमलेल्या ठेकेदाराचा होता, तसेच वृक्षतोडीबाबत कोणतीही परवानगी नसल्याने उद्यान विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी फिरकलेही नाहीत.

असे चालते रॅकेट

धोकादायक झाड (नसेल तरी) किंवा फांद्या छाटण्यासाठी नगरसेवक उद्यान विभागाला अर्ज देतात. उद्यान विभाग कोणतीही खातरजमा न करता ठेकेदाराला याबाबत सांगतो. मग फांद्या छाटणी असेल तरी ठेकेदार मोठे व जुने पुर्ण झाडच तोडून टाकतो. अशा पद्धतीने हे रॅकेट चालत असून ठेकेदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याची चर्चा आहे. अगोदर ठेकेदाराला महापालिका कोणताच मोबदला देत नव्हती, वृक्षतोडीतील लाकडामधून त्याला पैसे मिळत होते. त्यामुळे ठेकेदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठंमोठी झाडे तोडत होता. मात्र, याबाबत आयुक्ताकडे तक्रारी आल्यानंतर ठेकेदाराचे फक्त मनुष्यबळ व वाहने वापरण्याचे ठरले व वृक्षतोड किंवा फांद्या छाटणीमधून मिळारे लाकडे गोळा करून त्यांचा लिलाव करण्याचे ठरले आहे. मात्र, हे रॅकेट सर्रास झाडांच्या कत्तली करत आहे.

कायदा काय सांगतो

विनापरवाना वृक्षतोड करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, अथवा झाड जाळणे असे कोणतेही वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा गुन्ह्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार ५,००० रूपये दंड आणि १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. दरम्यान, पोलिस व उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कायद्याबाबत माहिती नाही.

येथे करा वृक्षतोडीची तक्रार

विनापरवाना वृक्षतोड करणे कायद्याने गुन्हा आहे. असे आढळून आल्यास या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. 1) मुख्य उद्यान अधिक्षक/वृक्षाधिकारी- 9922501518, 2) उद्यान अधिक्षक(वृक्ष)- 9922501928, 3) सी.सी. मोरे (अ प्रभाग)- 9922501938, 4) डी.के. बैचे (ब प्रभाग)- 9922501936, 5) पी.एल. कुंभार (क प्रभाग)- 9922501935, 6) व्ही.ए. शेलार (ड प्रभाग)- 9922501937