Pimpri

शहरातील तीन मतदान केंद्र महिलांच्या हाती

By PCB Author

October 20, 2019

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही ‘सखी’ मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. ही मतदार केंद्रे रांगोळ्या, फुगे लावून सजविण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. चिंचवडमधील पिंपळेनिलख, पिंपरी मतदारसंघातील पिंपरीगाव आणि भोसरी मतदारसंघातील निगडीत अशा तीन ठिकाणी ‘सखी’ मतदार केंद्र करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणे निवडणूक आयोगाने हा उपक्रम सुरू ठेवला. निवडणुकीत सखी, अर्थात “महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र करण्यात आले आहे. मतदान केंद्रात पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यानुसार सखी मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक, कर्मचारी, पोलिस यांचा समावेश असतो.

चिंचवड विधानसभेत पिंपळेनिलख शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३५८, पिंपरी विधानसभेत पिंपरीगावातील मतदान केंद्र क्रमाकं २०४ तर, भोसरी विधानसभेत निगडी यमुनानगरमधील अमृतानंदमयी शाळेत सखी मतदान केंद्र आहेत. सखी मतदान केंद्रात आवश्‍यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच, रांगोळ्या, फुगे लावून हे मतदार केंद्र सजविण्यात येणार आहेत.