Pimpri

तीनही आमदार भाजपकडून इच्छुक, चार जागेसाठी २९ जणांनी दिल्या मुलाखती

By PCB Author

August 27, 2019

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा जागांसाठी १४ तर मावळ या एकमेव जागेसाठी १५ इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (दि. २६) सायंकाळी झाल्या. चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीमधून आमदार महेश लांडगे तर मावळमधून राज्यमंत्री व आमदार बाळा भेगडे यांनीही मुलाखत दिली. राज्यमंत्री आणि पक्षाचे शहर प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी एकापाठोपाठ मुलाखती घेतल्या.  

तुम्हाला उमेदवारी का द्यावी व आमदार झाल्यावर काय करणार असे प्रश्न सर्वच इच्छुकांना विचारण्यात आले. तसेच उमेदवारी दिली नाही, तर काय करणार असा प्रश्नही भोसरी आणि चिंचवडमधील इच्छुकांना विचारला गेला. शहरातील तीन जागांसाठी १८ पैकी १४ जणांनी मुलाखती दिल्या. शहर कार्यालयात त्या झाल्या.

तर मावळसाठी सोमाटणे फाटा येथील एका हॉटेलमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मावळमध्ये एका जागेसाठी तब्बल १५ जणांनी त्या दिल्या. कुणीही शक्तीप्रदर्शन केले नाही. विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी मुलाखत दिली. तसेच तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके,लोणावळयाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकराव शेलार, पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी युवक अध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर आदींनी यावेळी मुलाखत दिली.