Pune

पुणे शहरातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी

By PCB Author

February 13, 2023

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुण्यात गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील गुगल कार्यालयाला फोन करुन एकाने ही धमकी दिली. तर, मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना एकाने फोन करुन मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी दिली आहे.

राज्यात एकाच दिवशी धमकीचे दोन कॉल आल्याने पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर, मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव यशवंत माने, असे सांगितले आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव यशवंत माने सांगितले आहे. मीरा-भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे. बॉम्बस्फोट रोखायचे असेल तर तातडीने पोलिसांना तेथे पाठवा, अशी धमकी या व्यक्तीने दिली.

सहायक पोलिस आयुक्तांनी अधिक माहिती विचारली असता त्याने शिवीगाळ करून फोन कट केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक आयुक्तांनी तातडीने मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांना तातडीने अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सहायक पोलिस आयुक्तांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी पोलिस करत आहेत. पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोनही काल रात्री करण्यात आला होता. त्यामुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. फोन येताच बॉम्ब शोधक पथकाने गुगलच्या कार्यालयाची संपूर्ण तपासणी केली. तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 45 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत हा फोन केला होता. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहतो. दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद आहेत. याच गोष्टीचा राग मनात धरून भावाला त्रास व्हावा, या उद्देशाने थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.