Pimpri

महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडची वाघीण अश्विनीताईंसाठी

By PCB Author

February 20, 2023

पिंपरी, दि.20 पीसीबी : मोठ्या संख्येने मराठवाड्यातील मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सभा घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडच्या वाघीणीसाठी आल्याचे सांगितले.

चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. लक्ष्मणभाऊंच्या निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी अश्विनीताई भरून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्मणभाऊंचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना आशिर्वाद द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मी येथे आले हे सफल झाले पाहिजे, मला मान खाली घालायला लागली नाही पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी `कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली`अशी जोरदार घोषणाबाजी उपस्थितांनी केली. तो धागा पकडून महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडची वाघीण अश्विनीताईंसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. रहाटणीतील विमल गार्डनमधील त्यांच्या या सभेला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे आदींसह अश्विनी जगताप व्यासपीठावर होते. पंकजांचे यावेळचे वीस मिनिटांचे भाषण त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीतच झाले. शास्तीकर माफीसारखा न्याय तुम्हाला आधी का मिळाला नाही, अशी विचारणा करीत भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतरच ही पूर्ण करमाफी झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदान मागणारे आम्ही वधूपक्षाकडील मंडळी आहोत, असे त्या नर्मविनोदी शैलीत म्हणताच, उपस्थितांनीही त्याला हसून दाद दिली.

शास्तीचा प्रश्न मिटवल्यानंतर आता शहरवासियांचा प्रॉपर्टी कार्डचीही समस्या मार्गी लावणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.अश्विनीताईंच्या विजयानंतर तसेच प्रॉपर्टी कार्ड वाटपासाठी मला बोलवा,असे त्या आपल्या स्टाईलमध्ये म्हणताच पुन्हा टाळ्या झाल्या.