‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून

0
413

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती ओसरल्यानंतर आता पुन्हा राजकीय यात्रा सुरू होत आहेत. या पूरस्थितीमुळे स्थगित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून नंदुरबार येथून सुरू होत आहे, तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा आज, सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. त्याचवेळी, राज्य सरकार आणि भाजपच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसची ‘पोलखोल यात्रा’ २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून नंदुरबार येथून सुरू होणार आहे. नंदुरबार ते सोलापूर अशा ११ दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा प्रवास १४ जिल्ह्यांतील ५५ विधानसभा मतदारसंघातून होणार आहे. सुमारे १ हजार ८३९ किमी अंतराचा हा प्रवास राहील, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व यात्राप्रमुख आ. सुजितसिंह ठाकूर यांनी येथे दिली.