ST कर्मचाऱ्यांच प्रतिनिधिमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; तेव्हा राज ठाकरेंनी ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले…

0
383

मुंबई, दि.११ (पीसीबी) : एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली.

राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचसंदर्भात राज यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,” असं राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं.

राज ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळातील सदस्यांनी आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असून आमच्या पगाराच्या वेळेसच पैसे कसे नसतात असा प्रश्न उपस्थित केलाय. “आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलिनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं?,” अशा शब्दांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने राज यांच्यासमोर व्यथा मांडली.

“आता पगार नाही वाढला तर काय करणार? आधीच १२ दिवस विदआऊट पे झालं आहे. विलिनीकरण न्यायालयाची तारीख येईल फटाके वाजतील. पण हाती काहीच आलं नाही तर काय? त्यामुळे आयोग लागू करा आणि नंतर विलिनीकरण करा अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारच्या निर्वाचनाला जो पगार देता तोच आम्हाला द्या. सरकार विलिनीकरणासंदर्बात तीन आठवडे मागतंय आम्ही एक महिना घ्यायला तयार आहोत,” असंही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय.