सोशल मीडीयामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो-प्रा. मृदुला कर्णी

0
645

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – रक्षाबंधन म्हणजे रक्षा करण्यासाठी बांधून घेतलेले बंधन व्रत आहे. आज सोशल मीडीयामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे. जे अनुभवतो ते विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहण्याची गरज आहे, हे त्यांना शिकविले पाहिजे. मुलींना धैर्यशील व स्व-संरक्षणासाठी समर्थ बनविले पाहिजे. असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख प्रा. मृदुला कर्णी यांनी येथे केले.  

नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात महिला मंच समितीच्या वतीने सखीबंधन या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी मुलांना रक्षाबंधन करून स्व-संरक्षणाबरोबरच आपल्या सखी, मैत्रीण यांच्याही संरक्षणाची जबाबदारी स्विकारावी. या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रा. कर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यावेळी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या प्रा. संजीवनी पाटील, प्राध्यापक, सर्व महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले, “सध्याच्या स्पर्धेच्या युगात माणसे नाती विसरायला लागली आहेत, अशावेळी रक्षाबंधांनासारख्या  उपक्रमाची आवश्यकता आहे. जुन्या चांगल्या परांपरचे जतन व अनुकरण झाले पाहिजे. सखीबंधंनाच्या माध्यमातून स्त्रियांनी आपल्यातील शक्ति ओळखून स्त्री शक्तीचा जागर समाज हितासाठी केला पाहिजे.”

प्रास्ताविक महिला मंच समिती प्रमुख डॉ. वैशाली खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कमायनी सुर्वे यांनी केले. तर उपप्राचार्य प्रा. मृणालिनी शेखर यांनी आभार मानले.